हे बंध रेशमी...

Monday, November 30, 2009

हे बंध रेशमी तुझ्यासवे
जुळले केव्हा मज ना कळले
प्रेमात तुझ्या होऊनी वेडी
क्षणोक्षणी मेणासम जळले

बंध रेशमी माझ्या मनीचे
तुझ्या मनी अलगद रुजले
तुझीच होऊनी सर्वस्वी मी
स्वप्नी तुझ्या निवांत निजले

बंध रेशमी नाजूक इतके
जणू ओठांवरी मोरपिसे
जरी रुतावे काटे मजला
तरी वेदना छळत नसे

बंध रेशमी तुझी नि माझे
शब्दापलीकडचे हे नाते
तुझ्या नि माझ्या मिलन समयी
सांज प्रणयी सरगम गाते
-काव्य सागर

ग्रीष्माचे चांदणे

Friday, November 27, 2009

ग्रीष्माचे चांदणे
माझ्या मनी बरसले
चाखण्यासी तरसले
ओठ माझे

ग्रीष्माचे चांदणे
काळ्या उन्हात रापले
मेघ सारे तापले
बरसन्या

ग्रीष्माचे चांदणे
पाण्यात विसावले
रानमाळ आसावले
बहरण्या

ग्रीष्माचे चांदणे
रूक्ष त्याची सावली
तरीही सुखावली
धुंद काया
- काव्य सागर

दिवस तुझे हे डुलायाचे

दिवस तुझे हे डुलायाचे
बाटली पाहून खुलायाचे

दारुत गुंगत जाणे
सोबती चकणा खाणे
पिण्यात जग ही भुलायचे

मोजावी बाटलीची खोली
करावी जीभ थोडी ओली
ग्लासात बुडून मारायचे

धरारे देशीची वाट
सोसेना बियरचा थाट
बिलांनी जखमी करायचे

जाताना अंधार्‍या राती
वाट दिसेना जरा ही
गटारापाशीच पडायचे

- काव्य सागर

सांगा कस प्यायच ?

सांगा कस प्यायच ?
लपत छपत की मित्रानसोबत
तुम्हीच ठरवा!

ग्लास भरून तुमचे दोस्त
एखादा पेग देतात ना ?
येता जाता रस्त्याने
लोक शिव्या घालतात ना ?
शिव्या खात बसायच की मित्रानसोबत हसायच
तुम्हीच ठरवा!

श्रावण मासात दारू
जेव्हा कुठेच सापडत नसते
तुमच्या स्वप्नी दारू देवता
बाटली घेऊन उभी असते
श्रावणमास पाळायच की दारू पीत लोळायच
तुम्हीच ठरवा!

खड्ड्यात पाय पडत असतात
हे अगदी खर असत
घरची वाट सापडत नसते
हे काय खरे नसत
खड्ड्यामधेच पडायाच की घराकडे वळायच
तुम्हीच ठरवा!

बाटली अर्धी उरली आहे
अस सुद्धा बोलता येईल
रात्र बरीच सरली आहे
अस सुद्धा म्हणता येईल
बाटली मधे बुडायाचे की गप जाऊन पडायचे
तुम्हीच ठरवा!

- काव्य सागर

सांगा कस सांगायाच ?

सांगा कस सांगायाच ?
गाणे म्हणत की तू आवडतेस म्हणत
तुम्हीच ठरवा!

डोळे फाडून तुम्ही तिच्याकडे
वर्गामधे पाहताच ना?
तिने ही पाहाव तुमच्याकडे
अस तुम्हाला वाटतच ना?
नुसतच पाहत बसायच की पुढेही काही बोलायच
तुम्हीच ठरवा!

सकाळी सकाळी लायब्ररीत
जेव्हा इतर कुणी नसत
तिच्याशी दोन शब्द बोलावे
पण धैर्य काही मनात नसत
तिच्याशी जाऊन बोलायच की अभ्यास करत बसायच
तुम्हीच ठरवा!

ओथात शब्द अडून बसतात
हे अगदी खर असत
इतर ही मुले तिच्यावर मरतात
हे काय खरे नसत
मनातल्या मनात कुढायच की थेट आय लव यू म्हणायच....
तुम्हीच ठरवा!

वर्ष अर्धे सरले आहे
असा सुद्धा म्हणता येईल
वर्ष अर्धे उरले आहे
असा सुद्धा म्हणता येईल
सरल्याचे दुख करायचे की उरल्याचे स्वप्न पाहायचे
तुम्हीच ठरवा!

- काव्य सागर

आता तरी....

Thursday, November 26, 2009

आता तरी पेटून ऊठ माणसा
अजुन किती सहन करायचे
तुझ्या साठी अन् तुझ्या देशासाठी
अजुन किती जणांनी मरायचे

कोण होते ते लोक जे देशासाठी लढले
कोणासाठी गमावले स्वत:चे प्राण
कशासाठी लादून घेतोस तू अहिंसेची बंधने
कशासाठी बाळगतोस हा पोकळ अभिमान 

आता तरी रक्त सळसलू दे तुझे
गोठलेले मन वितळू दे आता
लाचारीने जीणे की अभिमानाने
तूच सांग तुला कसे जगायचे

अजुन कसली वाट पाहतोयस तू
किती काळ शांत राहायचे नि सहन करायचे
पुरे झाले आता रेशमी पडद्यांचे जीणे
आता देशासाठी या काट्यावरुनच चालायचे

आता तरी पेटू दे आग मनात
त्यान्साठी जे लढले होते देशासाठी
शपथ ही तुला देशबांधवांची
अजून किती जणांनी मरायचे

-काव्य सागर

एक माझे मन अन्

Wednesday, November 25, 2009

एक माझे मन अन् एक तुझे मन
आहे प्रेम जरी तरी आहे एक पण

नकळता कोण जाणे कसे हे घडले
माझे वेडे मन तुझ्या प्रेमात पडले
क्षणोक्षणी मनी येई तुझी आठवण

तुझ्या सवे भिजताना पावसात चिंब
तुझ्या ओठी बरसावे होऊनी मी थेंब
तुझ्या सहवासी वाटे गुलाबी हे क्षण

तुझ्यासाठी झुरते रे सांगू मी हे कसे
पाण्याविन मासोलीचे हाल होई जसे
तसे होई वेडेपिसे तुझ्याविन मन

माझ्या मनी जरी फक्त नाव तुझे असे
तुझ्या मनी नव्हतेच कधी काही तसे
तरी वाट पाहते हे माझे वेडेपण
- काव्य सागर