ध्यास

Friday, April 24, 2020

तू सोडून गेलीस तेव्हा 
आसवे गाळली नाही 
स्मरणात तुझ्या मी फक्त
लिहिल्यात कविता काही 

नव्हतीस सोबती म्हणुनी
मी उदास झालो नाही 
पण पावसात भिजताना
मोहरलो न एकदाही 

डोळ्यांना अजुनी माझ्या
विसराया जमले नाही 
प्रत्येक चेहऱ्यामध्ये
ते रूप तुझेच पाही 

तू येशील जर परतुनी
कधी आठव येता माझी 
होतील सावळे नभ हे
गातील दिशा या दाही 

ऐकून साद ह्र्दयाची
मिटवून अंतरे सारी 
तू परतावे मजपाशी
हा ध्यास उराशी राही 

-काव्य सागर 

तख्त

Wednesday, April 22, 2020

सांडले रस्त्यावरी ते रक्त कोणाचे?
एकमेका भांडले ते भक्त कोणाचे?

ते म्हणाले विजय झाला लोकशाहीचा
लेकशाही राखते ते तख्त कोणाचे?

चिरडुनी कमळास देवा वाहिली भक्ती 
उमलले कोठे बघू प्राजक्त कोणाचे? 

सहज ते घेतात शपथा मारुनी थापा
सत्य का व्हावे कधीही व्यक्त कोणाचे?  

ठार केले संतही रागात येऊनी
सोडले येथे वळू उन्मत्त कोणाचे?

-काव्य सागर 

सोबत

Saturday, April 18, 2020

अडगळीच्या खोलीत सापडली 
एक जुनी कवितांची वही

धुळीत माखलेले काही शब्द 
आणि काही भावना कोंडलेल्या

काही मोडक्या तोडक्या चाली
अन् न लागलेले गंधारही

पूर्ण न केलेल्या काही कविता
आणि धूसर झालेले विचार 

आता या कवितांचं काय करायचं? 

घरदार, कर्तव्ये सांभाळतील ही मुलंबाळं 
कवितेस कोण सांभाळणार? 
तिच्या अपेक्षांचे ओझे फार आहे... 

फार बोलत नाही म्हणा ती! 
पण मी जाणतोच तिच्या मनातले

तिच्या पूर्णत्वाची आस लागून 
चार दिवस अधिक जगेन कदाचित

आणि नाहीच जमले तर मग
सरणावर माझ्यासोबत सती जायला
मागेपुढे पाहणार नाही ती

अनंतात विलीन झाल्यावरच
मुक्ती लाभेल तिला 
आणि त्यामुळेच मलाही

-काव्य सागर

अनोळखी

Thursday, November 15, 2018

ओळखीचे फार होतो हे खरे नाही
आपुले म्हटले तुला मी हे बरे नाही

जुंपली यंत्रापरी गर्दीत रेटूनी
माणसे राही अशी येथे घरे नाही

शर्यतीची वेस आहे दूरच्या देशी
चेहरे कुठलेच इथले हासरे नाही

घात करण्या लोक सारे येत धावूनी
हात कोणाचेच येथे कापरे नाही

दंगली होतात देवा रक्षिण्यासाठी
जाणती जे धर्म ऐसी मंदिरे नाही

-काव्य सागर

नोटबंदी

नोट मोजुनी अति मी दमले
थकले रे मोदी बाळा !

निलाजरेपण मतीस ग्रासले, स्वार्थीपणाचा शेला
सोनियाचे मज कुंडल कानी आणि घडविल्या माळा
करगंगेच्या काठावरती जमला पैसा काळा!

विषयवासना लागे जीवा, वय अपुले सरताना
कुठली नीती देशा पायी, कुसंगती करताना
नोट गुलाबी परि जमविण्या करी मी आणखी चाळा!

-काव्य सागर

श्वास

Monday, November 12, 2018

चालताना शीळ मी घालीत गेलो
सोसलेले घाव मी जाळीत गेलो

शोधली माझ्यात मी माझीच ओळख
पूर्वजांचे नाव मी टाळीत गेलो

काळ होता लागला मागे कधीचा
जीवनाशी वेळ मी पाळीत गेलो

वृत्त मी सांभाळता गझलेस लिहिता
नेमकेसे शब्द मी चाळीत गेलो

तृप्त होता जीवनाचे विष पिऊनी
तू दिलेले श्वास मी गाळीत गेलो

-काव्य सागर

नजरभेट

Thursday, November 1, 2018

जराच झाली नजरभेट अन
काळजास या घाव किती
मोहक चाळे नयनातून अन
सोज्वळतेचा आव किती

जराच होता बेसावध मी
तिने साधला डाव खरे
ह्रदय ही गेले चोरीला अन
नाव तिचे न ठाव बरे

जराच होता रंगत गेला
शब्दाविन संवाद जणू
ओठावरती हसू उमटता
मिळे गुलाबी दाद जणू

जराच होती मंतरलेली
वेळ जराशी जादूमय ती
निघून जाता सोडून गेली
गंधित श्वासांची दरवळ ती

-काव्य सागर