आळसे कार्यभाग नासतो ?

Monday, October 19, 2009

कोण तो शहाणा म्हणतो की
आळसे कार्यभाग नासतो
रम्य मधुर आलस्यमय
सुख वदनी काळे फासतो

आळसाचरणी मी विलीन
राहता सदैव कर्महीन
जीवन हे माझे कष्टावीन
सुखमय राहीन सर्वदा

आळसात आहे सर्व सुख
प्रसन्नपणात कष्ट खूप
गाळुणी घाम साहुनी दु:ख
का करिशी तू रूप बावळे

आळशी जरीही आम्ही असू
चेहर्‍यावरी आमुच्या हसू
मजेत लोळत घरी बसू
रात्रंदिन आम्हा आळसाचा
-काव्य सागर

येत्या पावसाळ्यात

येत्या पावसाळ्यात
मी भिजनार आहे

लोक हसतील ही
चेष्टा करतील ही
कोणी काहीही म्हणो
मी भिजनार आहे

आई मार देईल
सर्दी पण होईल
तरी चिंब होऊन
मी भिजनार आहे

मनातल्या तळ्यात
तळ्यातल्या पाण्यात
मनसोक्त खेळून
मी भिजनार आहे

तिच्या आठवणीत
तिच्या दुराव्यातही
फक्त तिचा होऊन
मी भिजनार आहे

स्वप्नातल्या जगात
दाट काळ्या ढगात
जगास विसरून
मी भिजनार आहे

डोळे मिटून मन
सुखाचे सारे क्षण
उरामध्ये भरून
मी भिजनार आहे
-काव्य सागर

हे तर नेहमीचेच

करायला गेलो एक
आणि झाले भलतेच
मग मनास वाटते
हे तर नेहमीचेच

चालता चालता मागे
वळून पाहायचेच
आणि पुन्हा चालायचे
हे तर नेहमीचेच

उगीचच आरशात
पाहत राहायचे
अन् कोरडे हसायचे
हे तर नेहमीचेच

एक खोटे बोलायचे
मग हजारदा खोटेच
खर्‍याहून खोटे खरे
हे तर नेहमीचेच

प्रश्न मनास द्यायचे
उत्तर ही स्वत:चेच
कोडे असे सुटायचे
हे तर नेहमीचेच

नव्याचे नवखेपण
नऊ दिवस जपायचे
पुन्हा जुन्यात रमायचे
हे तर नेहमीचेच

रात्र रात्र जागायचे
अंधारात जगायचे
गीत मनी रूजायचे
हे तर नेहमीचेच

स्वप्न एक पाहायचे
त्यात हरवून जायचे
वेड्यासारखे व्हायचे
हे तर नेहमीचेच

काहीतरी सुचायचे
वेड्यापरि लिहायचे
काव्य होऊन जायचे
हे तर नेहमीचेच
-काव्य सागर

पाहिजे म्हणजे पाहिजेच

पाहिजे म्हणजे पाहिजेच
प्रत्येक च मला पाहिजेच
चमचेगिरीच्या चं च: तून
चालूपणा केला पाहिजेच

जगण्यासाठी पैसा पाहिजे
पैशासाठी ही पैसा पाहिजे
त्याचा मार्ग कोणताही असो
पैसा मात्र आलाच पाहिजे

प्रेम तुझ्यावर केलेच पाहिजे
की प्रेम तुझ्यावरच केले पाहिजे
च ची जागा कोणतीही असो
प्रेम मात्र केलेच पाहिजे

स्वर्गाचे दारी गेले पाहिजे
पण आधी मेलेच पाहिजे
हवेहवेसे असतानाही
नको नको ते केलेच पाहिजे

हे पाहिजे मला ते पाहिजे
सगळ्यासाठी कष्ट पाहिजे
कष्टविना फळाचा मजला
प्रत्येक असा हट्ट पाहिजे

नोकरी हवी धंदा पाहिजे
सगळेच मी केले पाहिजे
इतर काही नाही निदान
काव्य तरी केलेच पाहिजे
-काव्य सागर

एक तू आणि एक मी

Saturday, October 17, 2009

एक तू आणि एक मी
बस आपण दोघेच
सोबती अबोल क्षण
गातात गीत जुनेच

एकांत असे सुंदर
कित्येक पाहिले होते
ते क्षण सारे मनात
साचून राहिले होते

तू बोलत नाही काही
अन् मी ही बोलत नाही
पण क्षण आठवांचे
गुणगुणतात काही

तुझ्या सावे चालताना
हा क्षण उदास वाटे
हात हाती नसताना
बोचतात हृदयी काटे

आज भेटलीस जरी
तरी तू माझी नाहीस
हे मनास सांगताना
आठवतात ते दीस

दुराव्यात तुझ्या जरी
विझलेले माझे मन
तरी तुझ्याच स्पर्शाचे
जपलेत काही क्षण
-काव्य सागर

पूर्वी जगायचो मी

पूर्वी गाणी गायचो मी जरी सूरात नसलो तरी
पूर्वी जगायचो ही मी जरी जमत नसले तरी

पूर्वी रमायचो ही मी धूसर स्वप्नांच्या दुनियेत
पूर्वी हसायचो ही मी येईपर्यंत पाणी डोळ्यात

पूर्वी भिजायचो ही मी मुसळधार पावसाळ्यात
पूर्वी निजायचो ही मी स्वप्नातल्या सुगंधी कल्यात

पूर्वी असायचो ही मी हे जीवन जगत सध्यात
पूर्वी नसायचो ही मी कुणाच्या अध्यात ना मध्यात

पूर्वी सारखे नसले तरीही जगतो आहे खरा
दु:ख आणिक वेदना अजुन भोगतो आहे खरा
- काव्य सागर

गेलेले दिवस

गेलेले दिवस ते परत येणार नाही
केलेल्या चुका आता दुरुस्त होणार नाही

तुझ्या वाचून माझे मन रमनार नाही
मला विसरने ही तुला जमणार नाही

गेले क्षण सोनेरी कसे कळणार नाही
प्रेमाची सांज पुन्हा तशी ढळनार नाही

आता मी तुझ्याविना कधी जगणार नाही
तू माझी हो याविना काही मागणार नाही

माझ्या विरही माझी साथ मिळणार नाही
प्रेमात माझ्या वेडी रात्र छळनार नाही
- काव्य सागर

संध्याकाळी या अशा

Monday, October 12, 2009

संध्याकाळी या अशा मंद त्या उषा निशा
सांज होई साजरी
प्रीतरंगी रम्य या विसरलो लता गीता
संध्या येत असे दारी

(मूर्ख तू नि धूर्त मी) असेन तुझिया संग मी
एक तू नि एक मी
डाव साधल्यामुळे आज मजला तू मिळे
रात सारी ही जाळे
स्वप्ना कधीचे हे असे हाय पुरे होत असे
आज माझिया घरी

प्रणय रंगी डुंबुनी ओठ तुझे चुंबुनी
ये मिठीत लाजुनी
(स्वप्न खोटे दावुनी) एकरूप होऊनी
जाऊ आज वाहुनी
(मिठीत तू असे जरी प्रेम असे प्रियावरी)
प्रीत ही असे खरी
-काव्य सागर

पोटा दुखे जनांच्या

पोटा दुखे जनांच्या अन् वेदना कुणाला
माझे सुख त्या खुपावे हा दर्दयोग आहे

साहु कशी ते सांगा कळ आतल्या पोटाची
चिरकाळ वेदनेचा मज पुढे काळ आहे

काही करू ना येता बसतो गळून येथे
माझी हालचालही अवघड होत आहे

हा दर्द वेदना ही काहीच साहवेना
सामर्थ्य हे गळूनी मी गलितगात्र आहे
-काव्य सागर

मी कशाला औफिसात जाऊ...

मी कशाला औफिसात जाऊ रे
मी कशाला पानऊतारा साहु रे
मी तर माझ्या रूपाचा राजा रे

रूपा भारी रूपवंत
बाप तिचा श्रीमंत
ऊडवी पैसा असा
आवरू मना कसा
प्रिये तुझ्याविना एकटा कसा राहू रे

लोक सारे चळतात
माझ्या वार जळतात
रात्रंदिनी नशा
पैसा माझ्या खिशा
राणी तुझ्याविना मी गीत कसा गाऊ रे
-काव्य सागर

मेंढीच्या पानावर

Sunday, October 11, 2009

मेंढीच्या पानावर डाव अजुन अडतोय रे
हुकुमाच्या राणीवर एक्का रुसून पडतोय रे

वाचविण्या डाव चले नयनी हा इशारा
चढवाया कोट मेंढीचा खटाटोप सारा

अजुन तुझे चौकटचे पान हाती दिसते रे
अजुन तुझ्या डोळ्यांतील चोरटेपण ठसते रे
-काव्य सागर

का मळला गणवेश

का मळला गणवेश,गधड्या
का मळला गणवेश

शाळेत वैरी एक ना भाराभर
शांत बसेना तू ही क्षणभर
जाशी कोठे,काय करसी तू
होण्या बावला वेश

रंग उडाला या चेहर्‍याचा
आव आणी तू दमदातीचा
अवताराचा ढॅंग बदलला
सारे विस्कतले केश
-काव्य सागर

घेऊन दारूची बाटली

घेऊन दारूची बाटली दारात ये ना
दारात ये ना थोडीशी घे ना
हळूच चाहूल लावीत घरात ये ना
घरात ये ना थोडीशी घे ना

बेछूट प्यावे आज रात सारी
गेली ही बायको तिच्या माहेरी
वाटे परि सख्या तुझा सहारा
अंगावरी चढे असा शहारा
तुझा सहारा असा शहारा हाय

नशेत आज दोघेही नहाती
चकणा ही संगे दारूच्या खाती
नसता ही अवदसा या धुंद राती
का सोडावी मी ही सुवर्नसंधी
या धुंद राती सुवर्नसंधी हाय
-काव्य सागर

चोर आहे साक्षीला

Saturday, October 10, 2009

मध्यरातीस मी जागे लोभ मनी हा जागला
चोर आहे साक्षीला
लाडवांची भूक लागे उपासाच्या रातीला
चोर आहे साक्षीला

मी हळू मोजूनी चोरपावले तोलतो
लाडवाचा डबा मी अलगद खोलतो
चोरट्या नजरेने मी तोंडात लाडू कोंबला

तोच एक चोरटा खिडकीने आत शिरला
भूक लागे त्यास तो जाण्या किचन कडे फिरला
स्वगत मी बोले की ठाऊक चोराच्या वाटा मला

अन् अचानक होत असे नजरभेट त्या क्षणी
कळतसे दोघांस आपण एका माळेचे मनी
चोरीचा हेतू विसरण्या त्यास मी लाडू दिला

तू ही खा लाडू हा हा बुंदिचा चंद्रमा
पैसे का चोरीसी दो चोरांच्या संगमा
आज चोरांनी सुखाने लाडू डब्बा उडविला
-काव्य सागर

अशी माणसे येती

अशी माणसे येती आणि मजा पाहुनि जाती
आता नुरली गंमत जंमत झाली सगळी माती

नवरदेव हा पहिला-वहिला
लग्नासाठी उभा राहिला
जरा भिऊनी हात दिला मी नवरीच्या हाती

भटजी येता मंत्र म्हटले
मी मरणाचे दार उघडले
घाम ही फुटला दरदरुण अन् धडकी भरली छाती

हार तिच्या गळी माझा पडला
गळ्यात माझ्या फास अडकला
पाहुनि माझी व्यथा पाहुणे हसती आणिक गाती
-काव्य सागर

आज उदार मम

आज उदर मम विशाल झाले
त्यास पाहुनि सदर लाजले

भात वाढीला बाया बापडी
माझ्या पानी टोपडी उपडी
संपविता ते पोट चोळिले

या खाद्याच्या कणाकणातून
भरून वाहले सारे तनमन
फुलता फुलता पोट ही फुलले
-काव्य सागर

मेघ माझिया मनीचे

Monday, October 5, 2009

मेघ माझिया मनीचे
का नभी दिसू लागले
दीप सारे अंतरीचे
का उगी विझु लागले

सूर्य होऊनि सावळा
मनीचा झिजत आहे
तो दूर अंधार्‍या जगी
विझुनी निजत आहे

घर एकट्या सांजेला
सारे विरान भासते
मनातल्या अंधारात
एक सावली दिसते

गाणे उदास मनाचे
गात डोळे हे मिटले
मंद वाहत्या पाण्याचे
नाद कानी उमटले

दुख मनीचे मांडण्या
आल्या सरी बरसाया
वाटे पसरली जणू
अंधारची मोहमाया
-काव्य सागर