कविता अशीच असते

Monday, December 3, 2012

मी एक कविता लिहिली
आणि फेकून दिली रस्त्यावर...
आता तिचे भवितव्य तीच जाणे !

ती वाऱ्याशी गुजगोष्टी करेल
त्यावर स्वार होऊन तरंगत राहील
तेव्हा कुणीतरी सहज खिडकीपाशी गुणगुणताना
सापडेल त्याला अलगदपणे...

कदाचित मातीत मिसळूनही जाईल
आणि उगवेल एखाद्या रातराणीच्या रूपात
मग कुणीतरी हिची तुलना तिच्याशी करेल
तेव्हा मोहरून जाईल ती...

अगदीच नाही तर मग
पावसात चिंब चिंब होऊन
जलसरींच्या नादाशी एकरूप होईल
बेमालूमपणे एखादे गीत होऊन...

अन हेही जमले नाही तर
ज्या ठिकाणी शेवटचा श्वास घेतला
तेथून जाणाऱ्या एखाद्या कवीला झपाटून टाकेल
पण आपले ध्येय साध्य केल्याशिवाय तिला शांती लाभणार नाही...

कविता अशीच असते...कविता अशीच गवसते.

-काव्य सागर

शब्दांवाचून

Tuesday, August 21, 2012

एक एक कविता माझी विकेन म्हणतो मी
शब्दांवाचून पुन्हा जगाया शिकेन म्हणतो मी

या जगण्याला कधी लाभला शब्दांचा आधार ?
शब्द असे भिनतात अंगी की जणू जडे आजार

व्याधी नसते साधी ही जी आपसूक जडलेली
कधी उपाशी शब्दाविन ती मूकपणे अडलेली

तरी रंगुनी शब्दमहाला नवे मांडले काही
कसे नकळता नयनातून या शब्द सांडले काही

भौतिकतेच्या या जगती हे काव्य कशाला पुरे
मी गेल्यावर शब्दाखेरीज काय तळाशी उरे ?

अता न भुलन्याचा शब्दांना केला मी निर्धार
वैद्य म्हणे हा रोग असे अन हाच असे उपचार

पोकळ साऱ्या बाता तरीही टिकेन म्हणतो मी
शब्दांवाचून पुन्हा जगाया शिकेन म्हणतो मी

-काव्य सागर

कधी कधी

Monday, June 25, 2012

उधळून मुक्त दाने द्यावी कधी कधी
हिंडून गाव भिक्षा घ्यावी कधी कधी

बहरात या ऋतूच्या, कोमेजलो असा
वाटे समोर तू ही यावी कधी कधी

वृत्तात ना लिहावी, स्वच्छंद जन्मता
गझलेसमान ती ही व्हावी कधी कधी

जे सोडती न आशा, ध्येयास पाहता
अंती तयास लाभे, चावी कधी कधी

ते वाहती फुलांचे, निर्माल्य सागरा
त्यानेहि भावसरिता, प्यावी कधी कधी

-काव्य सागर

ओळख

Monday, May 21, 2012


ते म्हणतात की ओळखतात मला...

ते मला पाहतात, बोलतात माझ्याशी
आणि आपापल्यापरीने मला ओळखून असतात...

जन्मल्या क्षणापासून जे गणित
अधिकाधिक क्लिष्ट होत चालले आहे
ते पूर्ण जाणून घेतल्याविनाच सोडवू पाहतात त्याला...

उद्या मी गेल्यावर म्हणतील
ओळखायचो मी त्याला,
माझ्याबद्दल काही मते मांडून
कमी जास्त अश्रूदेखील ढाळतील...

ते खोटे नसतील म्हणा !
पण प्रत्येकाला उमगलेला मी
माझ्या एकूण अस्तित्वाचा
कितवा अंश असेल हे कुणाला ठावूक ?

ते ठावूक होण्याआधीच
मी मागे ठेवून गेलो असेन
माझी अस्पष्टशी ओळख

खरी ओळख मात्र रहस्याप्रमाणे
कायमची गाडली जाईल...

ती फक्त 'त्याला' आणि मलाच ठावूक !

-काव्य सागर

सखे कशाला

Sunday, February 26, 2012

सखे कशाला फिरायचे चांदण्यात जग थांबले असावे
तुला पाहण्या अधीरला चंद्रमा ग्रहण लांबले असावे

नभात ज्या तारका पहुडती जळून गेल्या तुझ्या रुपावर
उगा न उल्का अशा विखुरती कुणी नभी भांडले असावे

कशा कुणा ना कधी गवसल्या तुझ्या पदांकीत पायवाटा
नभांगणातून नक्षत्रांचे सडे धरी सांडले असावे

असे नको भासवू प्रिये की तुला तुझी आयुधे न ठावुक
मला न शंका तुला बघोनी कुणी सुखे नांदले असावे

तसे तुझ्या कौतुका लिहाव्या कितीक गझला, कथा किती गे
उधार घेऊन शब्द कविने मनातले मांडले असावे

-काव्य सागर

त्रिवेणी- दारू

Tuesday, January 17, 2012

तुझी नशा अफाट होती 
या दारूपेक्षा सरसच तू
.
.
.
.
तू विकली जात नाहीस हे किती बरे आहे!

*************************

मला माणसांची किंमत कळते
दारूची तेवढी कळत नाही
.
.
.
.
चष्म्याचा नंबर वाढलाय बहुतेक!

************************

ग्लासात देशी आहे की इंग्लिश
याचा विचार करत नाही मी 
.
.
.
.
जाती-धर्माच्या विरोधातच आहे मी!

*************************

ग्लास अर्धा भरलाय असंही म्हणता येतं
ग्लास अर्धा रिकामा आहे असंही म्हणता येतं 
.
.
.
.
म्हणा काहीही, हा ग्लास बाटलीचा गुलाम आहे !

**************************

पुन्हा भेटशील तेव्हा जाब विचारेन तुला
तू दिलेल्या दु:खाचा हिशोब लिहून ठेवलाय
.
.
.
.
बियर बारच्या मालकाकडे रेकॉर्ड आहे सगळा!

-काव्य सागर