''कविता कशा सुचतात रे ?''

Wednesday, December 16, 2009

''कविता कशा सुचतात रे ?''
माझ्या मित्राचा नेहमीचा प्रश्न
मी त्याकडे पाहतो आणि फक्त हसतो

'' अरे फार काही अवघड नाही रे
एक कोरा कागद, एक पेन आणि अस्वस्थ मन
एका जागी जमले, सूर जुळले की
मग होऊन जाते कविता
वार्‍यावर उडणार्‍या पिसाप्रमाणे मन भरकटू लागते
अन् भरकटल्यासारख्या कविता करू लागते
आता हल्ली कविता भरकटत चालल्या आहेत खर्‍या
पण जिथे माणूसच भरकटत आहे तिथे कवितांच काय ?

कविता म्हणजे स्वातंत्र्य, कविता म्हणजे मोकळा श्वास
कुणी शिकवून येत नाहीत रे कविता
इथे शब्दांची जुळवाजुळव नको अन् भावनांचा आविष्कार ही नको
केवळ जे सुचेल ते लिहावे, मनास रुचेल ते लिहावे
कुणाच्या तरी प्रेमात ही पडावे
एकदा तिच्या प्रेमात पडलो की कवितांची वेल अशी बहरते म्हणून सांगू...
मग ध्यानी मनी केवळ प्रेमाच्याच कविता...
प्रेम असेपर्यंत सगळे ठीक असते
पण विरहात मात्र शब्दच अधिक साथ देतात
मग शब्दांच्या प्रेमापुढे ते प्रेम फिके वाटू लागते
बघता बघता आपण कवितेच्याच प्रेमात पडू लागतो

पहिल्यांदा जो फक्त छंद असतो
त्याची नंतर सवयच लागते
वेड्यासारख्या कविताच करायला लागतो
दिवसभर जिथे तिथे कविताच
रात्र-रात्र जागून काढली आहे रे
आणि अंधारात चाचपडत एका कोर्‍या कागदावर
दिसत नसतानाही कविता लिहिली आहे
काय सांगू तुला ?

हे वेडेपण अंगात भिनत जाते
आणि वेडेपणाने जगण्यात खरा शहानपणा आहे हेही कळत जाते
मग शहाण्यासारखे जगण्याचा वेडेपणा कोण करणार ?
हळूहळू व्यसनच लागते कवितांचे
मग आपल्या नेहमीच्या बोलण्यालाही लोक कविताच समजू लागतात
अर्थात आपल्याला काही फरक पडत नाही
आपण स्वछन्दपणे या आभाळात विहरतो
सुख-दु:खाच्या या फसव्या जगापासून
आपण केव्हाच मुक्त होऊन जातो
आता फक्त मी आणि माझी कविता
मी तिच्यात भिनत जातो आणि ती माझ्यात... ''

एवढे सांगून ही हे शहाणे लोक काही समजत नाही
आणि शेवटी वेड्यासारखा प्रश्न विचारून मोकळे होतात

'' मला शिकवशील का रे कविता ?''
मी त्याकडे पाहतो आणि फक्त हसतो....

-काव्य सागर

10 comments:

हेरंब said...

अप्रतिम.. खुपच सुंदर !!

Sagar Kokne said...

धन्यवाद....

kirti said...

भन्नाटच...खूप छान लिहिता

Sagar Kokne said...

ही माझी पण फार आवडती कविता

Suhas Diwakar Zele said...

जबरी...आवडेश !!

Sagar Kokne said...

धन्य....इतकी जुनी कविता उकरून काढल्याने मला ही पुन्हा वाचता आली!

sanket said...

अहाहा !! काय सुंदर कविता आहे !! पुन्हा उकरून काढतोय..

"आणि अंधारात चाचपडत एका कोर्‍या कागदावर
दिसत नसतांनाही कविता लिहीली आहे " >> अगदी खरे...आणि कागदही नसला की मोबाईलवर टाइप करून ठेवलीये. :)

कविता ’पाडणार्‍यांचा’आणि चोरांचादेखील सुळसुळाट झालाय खरा.

’मला शिकवशील का रे कविता ? ’ हाहाहा !! मी अशांसाठीच कविता पाडण्याचा लेख लिहीला होता, तो तुला माहीत आहेच :) घ्या लेको, पाडा कविता !! :D :D D

Sagar Kokne said...

अशा स्वैर कविता करण्यात जास्तच मजा येते...
आणि ती अंधारातली कविता एकदा खरोखर लिहिली होती कागदावर
मोबाईलवर टाईप करण्यात काही मजा नाही रे...
पाडाडी तर भन्नाटच आहेत !

Unknown said...

खुपच छान !!!
मलाही रात्री स्वतःशी बोलतानाच कविता सुचतात आणि मग रात्रीच उजळणी करून घ्यावी लागते आणि सकाळी उठल्यावर मग उतरवव्या लागतात. आणि खरच कविता लिहायची सवय लागली कि मग जिथे तिथे कविताच सुचतात वेड्यासारख्या. पण एखादी गोष्ट, भावना दोन तीन पानात मांडण्यापेक्षा काही ओळींत मांडणे सोपे जाते आणि आवडतेही.
http://jivanika-mazyakavita.blogspot.com/
http://jivanika-kavita.blogspot.com/
जमल्यास माझ्याही ब्लोग्सना भेट दे.

Sagar Kokne said...

धन्यवाद जीवनिका...
कविता अस्वस्थ करत राहतात हेच खरे...

Post a Comment