ओंजळ

Wednesday, December 14, 2011

त्या ओंजळ भर पाण्याने
अर्घ्य वाहिले असेल पहाटे पहाटे

त्या ओंजळ भर पाण्यातूनच
उगम झाला असेल एखाद्या गंगेचा

त्या ओंजळ भर पाण्यात
भर पडली असेल कुणाच्या आसवांची

त्या ओंजळ भर पाण्यात
आपला चेहरा पाहून लाजलेही असेल कोणी

त्या ओंजळ भर पाण्याने
शमली असेल तहान थकल्या-भागल्याची

त्या ओंजळ भर पाण्याने
झोप उडाली असेल कित्येक वर्षे झोपलेल्यांची

ओंजळ भर का असेना...
पण त्या पाण्याला जीवन ऐसे नाव आहे...
-काव्य सागर

घाव

Monday, November 21, 2011

जे जे हवे होते मला मी तेच होते टाळले
मी नेमके माझ्यातुनी तुजलाच होते गाळले

झाली किती स्मरणे तुझी झाल्या किती जखमा नव्या
नुसताच वारा लागला अन रक्त हे साकाळले

मी शोधले पत्ते तुझे थकवून सारी अंतरे
सांगे निखारा कालचा ज्याने नकाशे जाळले

आले नव्याने बहर हे आला तसा वारा पुन्हा
मी पाहता वळुनी पुन्हा सारेच होते वाळले

फसवून नियतीने दिल्या दु:खासवे मी रंगलो
मी घाव सोसत राहिलो बाकी उगा किंचाळले

-काव्य सागर

काळा चष्मा

Sunday, September 18, 2011


या काळ्या चष्म्यामागून
पाहत जाईन तुला...

तुझ्या नजरेस नजर मिळवणे अवघड वाटले
तरी चोरून चोरून पाहीन तुला...

या काळ्या चष्म्याआड दडलेत डोळे
तुझा आदर करणारे...तुझ्यावर प्रेम करणारे...

कधीतरी तुझ्यासारखे बनण्याचे स्वप्न पाहणारे वेडे डोळे...
आणि म्हणूनच उघड्या डोळ्यांनी
तुझ्याकडे पाहण्याची हिम्मतच होत नाही...

तू ओळखशील माझ्या डोळ्यांतील अपराधी भाव...
तुला दिलेल्या वचनांची पूर्तता न केल्याने आलेला अपराधीपणा

एव्हाना पर्यंत तू तो ओळखला असशीलच...
पण तरीही तो लपवण्याचा प्रयत्न आहेच...
स्वत:ला फसवत जगण्याचा प्रयत्न आहेच...
मिटल्या डोळ्यांनी हसण्याचा प्रयत्न आहेच...

 -काव्य सागर

कवितेपायी

Friday, July 22, 2011

कुठल्याश्या कवितेपायी 
मी विसरून गेलो तुजला 
हे भास असे प्रतिदिवशी
होतात सखे ग मजला

मी विसरून गेलो आहे
तुजवर रचल्या कविता
पण शब्द शब्द कवितेचे 
मी लिहिले तुझ्याचकरिता

तू सोडून मज जाताना
जी लकेर गाऊन गेली
त्या नाजूक वेलीवरती 
कवितेची फुले उमलली 

हे काय मला मग झाले 
कवितेचे वेडच जडले 
अन शब्द ओंजळीत घेता 
प्रतिबिंब तुझेच पडले 
 
पण कवितेचे दुर्भाग्य
ती सवत तुझी बघ झाली
अन याद तुझी जपताना 
माझ्यातच विलीन झाली 

-काव्य सागर

अणुबॉम्ब

Sunday, May 15, 2011

बघेन बघेन आणि
एक अणुबॉम्ब टाकीन म्हणतो...

म्हणजे कसं एका झटक्यात
सारे रान मोकळे
म्हणजे एकदाच या जाचातून
साऱ्यांची सुटका होईल...

हा...तसं त्या असंख्य जीवांच्या
हत्येचे पाप लागेल मला...
पण चालायचेच !...
.
.
.
...घर स्वच्छ ठेवायचे
तर हे व्हायलाच हवे...
जाम उच्छाद मांडलाय
मुंग्यांनी घरात !
काहीतरी करायलाच हवे ना...!

-काव्य सागर

अश्वमेध यज्ञाचा घोडा

Saturday, May 14, 2011

अश्वमेध यज्ञाचा घोडा
धावतो आहे...
गेली कित्येक वर्षे
वेड्यासारखा धावतोच आहे...
आणि आता वेगही वाढलाय त्याचा...
वाऱ्याशी स्पर्धा करत
सुसाट सुटलाय तो...
आता त्याला कसलीच पर्वा नाहीये...
वेग...वेग हवाय फक्त त्याला...
त्याला सोडणारा मात्र
कधीच काळाच्या पडद्याआड गेला...
पण या घोड्याला
त्याचा थांगपत्ताच नाही...
आणि त्याला हवे असलेले गाव
तर कित्येक कोस दूर राहिले आहे...
तो तरीही धावतोच आहे...
आता मागे वळून पहिले
तरी पाय मात्र मागे वळत नाहीत...
त्यांना सवय लागलीय
पुढेच जाण्याची...
वेळीच थांबले असते तर बरे झाले असते...

-काव्य सागर

प्रतिभा

Wednesday, April 20, 2011

अंतरंगात खोलवर कुठेतरी दडलेली
आणि वेळोवेळी मला छळणारी...ती प्रतिभा कुठे गेली ?

अंधारात चाचपडताना आशेचा किरण बनून
माझ्या रोमरोमी जळणारी...ती प्रतिभा कुठे गेली ?

कधी वसंत कधी शिशिर बनणारी
कधी आपुलेच रंग उधळणारी

आपल्याच धुंदीत जगणारी
सावलीहून अधिक साथ देणारी

कधी जगण्याचे साधन होणारी
कधी श्वासांची जागा घेणारी

दु:खात अधिकच उफाळून येणारी
आणि सुखात भरभरून देणारी

...एका अपघाताने का प्रतिभा नाहीशी होते ?
मी जिवंत आहे म्हणजे ती ही आहेच...!
प्रतिभा अशी मरणार थोडीच...
कदाचित मी गेल्यावरही असेल ती इथेच
माझ्या आठवणींची शिदोरी बनून...

-काव्य सागर

ती...

Thursday, March 3, 2011

अजून ही मला खरं वाटत नाही
ती नाहीये हे मनास पटत नाही

आता काल-परवा पर्यंत ती होती
माझ्या अवती-भवती दरवळत
एखाद्या उमळत्या कळीप्रमाणे
मनात भिनलेली कळत-नकळत

ती होतीच तितकी सुंदर
कानात अजूनही आहेत तिचे बोल
तिची साथ म्हणजे जणू इंद्रधनू
प्रत्येक रंग त्याचा होता अनमोल

तिच हसणं तिच असणं
हे किती सुखद असायचं
गोजिर्‍या गाली तिच्या
फूलपाखरू हसायचं

तिचे श्वास हेच माझे आयुष्य
तिच्याविना मी कुठे जगत होतो
सुखाच्या सागरी निजावं तिने
हेच देवाकडे मागणं मागत होतो

पण ती खरंच एक कळी होती
कळीच आयुष्य ते केवढं
मूठभर पाणी हाती घेऊन
ती उघडल्यावर राहील तेवढं

चिमुकल्या हातांनी जन्मभराच्या
आठवणी देऊन गेली आहे
प्राण माझे ही घेऊन गेली
शरीर फक्त ठेऊन गेली आहे

- काव्य सागर

मी शेंगा खाल्ल्या नाही

Tuesday, February 1, 2011

मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले टाकली नाही
मी शिक्षा करतील म्हणुनी, ती कधी उचलली नाही

भवताली दंगा चाले, तो शांतपणे बघताना,
कुणी हसता-खिदळताना, कुणी गाणी ही म्हणताना
मी निवांत वाचत बसलो, भूगोलाचे पुस्तक जेव्हा,
मज चिडवायाला देखील, पण कुणी डिवचले नाही

बेशिस्त वर्ग हा आहे, एकाहून वरचढ येथे
येताच परीक्षा जवळी, चोरुनी फाडती पाने
पण खिशात माझ्या कुठली, कॉपी वा चिट्ठी नाही
मी वळून पाहिले नाही, वा पाहू दिले नाही

धुतले न अजून मजला, मी खोडी न केली काही
निकालावर सजून दिसते, बाबांची लांबशी सही
मी मनात नाही भ्यालो, मी कुणास नाही भ्यालो
मी घरात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही

-काव्य सागर

रात्रीस खेळ चाले

Thursday, January 27, 2011

रात्रीस खेळ चाले या धुंद दारुड्यांचा
संपेल न कधीही हे खेळ बाटल्यांचा

ही दारू न स्वयंभू, सोडा तू ओत थोडा
उपवास सोडताना, बंधने सारी तोडा
पित्यास होई भारी, हा शाप श्रावणाचा

आभास बायकोचा, होतसे बाटलीत
हे सत्य नाही सांगे, चकणा या ताटलीत
भितात बायकोला हा दोष, न पिण्याचा

या साजीऱ्या क्षणाला, का असशी घाबरून
सुटतील सारे प्रश्न, घे थोडी तू पिऊन
गवसेल सूर भलता, या झिंगल्या मनाचा

-काव्य सागर

तुला प्रेम करणे जमलेच नाही...

Monday, January 10, 2011

तुला प्रेम करणे जमलेच नाही
आणि मला ते व्यक्त करणे

मी वाट पाहिली तुझ्या येण्याची
तुला वाट पाहणे जमलेच नाही
आणि मला तुझ्या वाटेवर चालणे...

मी खूप एकटा होतो तुझ्याविना
तुला साथ देणे जमलेच नाही
आणि मला तुझी साथ मागणे...

मी गुंतत चाललो होतो तुझ्यात
तुला हे गुंतणे समजलेच नाही
आणि मला ते तुला समजावणे...

मी प्रेमात पडलो खरा तुझ्या
तुला या नात्याचा अर्थ कळलाच नाही
आणि मला त्याचा अर्थ सांगणे...
- काव्य सागर