अनोळखी

Thursday, November 15, 2018

ओळखीचे फार होतो हे खरे नाही
आपुले म्हटले तुला मी हे बरे नाही

जुंपली यंत्रापरी गर्दीत रेटूनी
माणसे राही अशी येथे घरे नाही

शर्यतीची वेस आहे दूरच्या देशी
चेहरे कुठलेच इथले हासरे नाही

घात करण्या लोक सारे येत धावूनी
हात कोणाचेच येथे कापरे नाही

दंगली होतात देवा रक्षिण्यासाठी
जाणती जे धर्म ऐसी मंदिरे नाही

-काव्य सागर

नोटबंदी

नोट मोजुनी अति मी दमले
थकले रे मोदी बाळा !

निलाजरेपण मतीस ग्रासले, स्वार्थीपणाचा शेला
सोनियाचे मज कुंडल कानी आणि घडविल्या माळा
करगंगेच्या काठावरती जमला पैसा काळा!

विषयवासना लागे जीवा, वय अपुले सरताना
कुठली नीती देशा पायी, कुसंगती करताना
नोट गुलाबी परि जमविण्या करी मी आणखी चाळा!

-काव्य सागर

श्वास

Monday, November 12, 2018

चालताना शीळ मी घालीत गेलो
सोसलेले घाव मी जाळीत गेलो

शोधली माझ्यात मी माझीच ओळख
पूर्वजांचे नाव मी टाळीत गेलो

काळ होता लागला मागे कधीचा
जीवनाशी वेळ मी पाळीत गेलो

वृत्त मी सांभाळता गझलेस लिहिता
नेमकेसे शब्द मी चाळीत गेलो

तृप्त होता जीवनाचे विष पिऊनी
तू दिलेले श्वास मी गाळीत गेलो

-काव्य सागर

नजरभेट

Thursday, November 1, 2018

जराच झाली नजरभेट अन
काळजास या घाव किती
मोहक चाळे नयनातून अन
सोज्वळतेचा आव किती

जराच होता बेसावध मी
तिने साधला डाव खरे
ह्रदय ही गेले चोरीला अन
नाव तिचे न ठाव बरे

जराच होता रंगत गेला
शब्दाविन संवाद जणू
ओठावरती हसू उमटता
मिळे गुलाबी दाद जणू

जराच होती मंतरलेली
वेळ जराशी जादूमय ती
निघून जाता सोडून गेली
गंधित श्वासांची दरवळ ती

-काव्य सागर

जादू तुझी अशी

Monday, October 22, 2018

जादू तुझी अशी आहे माझ्यावरी
स्मरणात तुझ्या बरसे चांदण्यांच्या सरी

सखे तुझ्या हसण्याने फुलती रुतू
दिसता तू बहरती जगण्याचे हेतू
अर्थ लाभे जीवनाला साथ मिळता तुझी
दे प्रिये तू हात हाती आस मजला तुझी

तुझ्यासाठी मनोमनी मी झुरतो किती
तुझ्याविना क्षणोक्षणी मी विरतो किती
बंध सारे तोडूनिया ये तू माझ्यापाशी
साजिरी ही रात झाली मिलनाची अशी

प्रवासी

Tuesday, September 11, 2018

उरी घाव सोशीत जाईन मीही
नव्याने पुन्हा गीत गाईन मीही

जरी अंधकारात रात्रंदिनी मी
उद्याचा उष:काल पाहीन मीही

निघालो असा दूरच्या मी प्रवासा
नवे गाव शोधीत राहीन मीही

विषाचे घडे पेरलेले नशीबी
सडे अमृताचेच वाहीन मीही

जरी खोल आहे जुने दु:ख माझे
सुखाच्या सरी आज नाहीन मीही

-काव्य सागर

दाद

Sunday, April 15, 2018

बोलणारे बोलताती आपुल्याला काय त्याचे?
मी जगावे की मरावे या जगाला काय त्याचे?

पूर्वजांच्या दौलतीचे सोहळे मी रोज केले
आज वैभव भोगतो मी पण उद्याला काय त्याचे?

गाळती ते घाम सारे पिकविण्या मातीत मोती
पण अवेळी कोसळे त्या पावसाला काय त्याचे?

रोज अत्याचार होतो मंदिराच्या पायथ्याशी
सोंग घेऊ झोपलेल्या माणसाला काय त्याचे?

वाह! कोणी दाद देती, मर्म ही कळल्याविना ते
वाचका तू कमनशीबी सागराला काय त्याचे?

-काव्य सागर

वरदान

Sunday, March 4, 2018

शब्दांस माझिया या ताल लाभू दे
गाण्यास सूर त्याला चिरकाल लाभू दे

मी पेरलेत थोडे शब्द कालच्या भुईत
त्या स्पर्श जीवनाचा आज लाभू दे

बंदिस्त काल होते झाले ते मोकळाले
घेण्यास त्या भरारी अवकाश लाभू दे

भिडतील काळजाला विसरोनी वर्णभेद
मिरवावयास ऐसी जात लाभू दे

माझे मी काय गातो, देणे गुणिजनांचे
शब्दांस अमृताचे वरदान लाभू दे

-काव्य सागर