तख्त
Wednesday, April 22, 2020
अनोळखी
Thursday, November 15, 2018
ओळखीचे फार होतो हे खरे नाही
आपुले म्हटले तुला मी हे बरे नाही
जुंपली यंत्रापरी गर्दीत रेटूनी
माणसे राही अशी येथे घरे नाही
शर्यतीची वेस आहे दूरच्या देशी
चेहरे कुठलेच इथले हासरे नाही
घात करण्या लोक सारे येत धावूनी
हात कोणाचेच येथे कापरे नाही
दंगली होतात देवा रक्षिण्यासाठी
जाणती जे धर्म ऐसी मंदिरे नाही
-काव्य सागर
श्वास
Monday, November 12, 2018
चालताना शीळ मी घालीत गेलो
सोसलेले घाव मी जाळीत गेलो
शोधली माझ्यात मी माझीच ओळख
पूर्वजांचे नाव मी टाळीत गेलो
काळ होता लागला मागे कधीचा
जीवनाशी वेळ मी पाळीत गेलो
वृत्त मी सांभाळता गझलेस लिहिता
नेमकेसे शब्द मी चाळीत गेलो
तृप्त होता जीवनाचे विष पिऊनी
तू दिलेले श्वास मी गाळीत गेलो
-काव्य सागर
प्रवासी
Tuesday, September 11, 2018
उरी घाव सोशीत जाईन मीही
नव्याने पुन्हा गीत गाईन मीही
जरी अंधकारात रात्रंदिनी मी
उद्याचा उष:काल पाहीन मीही
निघालो असा दूरच्या मी प्रवासा
नवे गाव शोधीत राहीन मीही
विषाचे घडे पेरलेले नशीबी
सडे अमृताचेच वाहीन मीही
जरी खोल आहे जुने दु:ख माझे
सुखाच्या सरी आज नाहीन मीही
-काव्य सागर
दाद
Sunday, April 15, 2018
बोलणारे बोलताती आपुल्याला काय त्याचे?
मी जगावे की मरावे या जगाला काय त्याचे?
पूर्वजांच्या दौलतीचे सोहळे मी रोज केले
आज वैभव भोगतो मी पण उद्याला काय त्याचे?
गाळती ते घाम सारे पिकविण्या मातीत मोती
पण अवेळी कोसळे त्या पावसाला काय त्याचे?
रोज अत्याचार होतो मंदिराच्या पायथ्याशी
सोंग घेऊ झोपलेल्या माणसाला काय त्याचे?
वाह! कोणी दाद देती, मर्म ही कळल्याविना ते
वाचका तू कमनशीबी सागराला काय त्याचे?
-काव्य सागर
कधी कधी
Monday, June 25, 2012
बहरात या ऋतूच्या, कोमेजलो असा
वाटे समोर तू ही यावी कधी कधी
वृत्तात ना लिहावी, स्वच्छंद जन्मता
गझलेसमान ती ही व्हावी कधी कधी
जे सोडती न आशा, ध्येयास पाहता
अंती तयास लाभे, चावी कधी कधी
ते वाहती फुलांचे, निर्माल्य सागरा
त्यानेहि भावसरिता, प्यावी कधी कधी
-काव्य सागर
सखे कशाला
Sunday, February 26, 2012
तुला पाहण्या अधीरला चंद्रमा ग्रहण लांबले असावे
नभात ज्या तारका पहुडती जळून गेल्या तुझ्या रुपावर
उगा न उल्का अशा विखुरती कुणी नभी भांडले असावे
कशा कुणा ना कधी गवसल्या तुझ्या पदांकीत पायवाटा
नभांगणातून नक्षत्रांचे सडे धरी सांडले असावे
असे नको भासवू प्रिये की तुला तुझी आयुधे न ठावुक
मला न शंका तुला बघोनी कुणी सुखे नांदले असावे
तसे तुझ्या कौतुका लिहाव्या कितीक गझला, कथा किती गे
उधार घेऊन शब्द कविने मनातले मांडले असावे
-काव्य सागर
घाव
Monday, November 21, 2011
झाली किती स्मरणे तुझी झाल्या किती जखमा नव्या
नुसताच वारा लागला अन रक्त हे साकाळले
मी शोधले पत्ते तुझे थकवून सारी अंतरे
सांगे निखारा कालचा ज्याने नकाशे जाळले
आले नव्याने बहर हे आला तसा वारा पुन्हा
मी पाहता वळुनी पुन्हा सारेच होते वाळले
फसवून नियतीने दिल्या दु:खासवे मी रंगलो
मी घाव सोसत राहिलो बाकी उगा किंचाळले
-काव्य सागर
नाते तुझ्या-माझ्यातले
Tuesday, February 23, 2010
तूच माझ्या पासुनी का दूर जाऊ लागली
मी तुझ्या डोळ्यांमध्ये जी पहिली होती अदा
तीच आता घाव घालूनी डाव साधू लागली
मीच वेडा गात होतो गंजले गाणे जुने
तू नव्याने जीवनाचे गीत गाऊ लागली
श्वास माझे गुंतले होते तुझ्या श्वासामध्ये
तू स्वत:ला जाळूनी मजला ही जाळू लागली
काय म्हणूनी जाहलो होतो तुझा वेड्यापरि
तूच या वेड्याची आता साद टाळू लागली
रिक्त आणिक कोरडे झाले जीणे माझे आता
आज सारी जिंदगी ही व्यर्थ वाटू लागली
-काव्य सागर
गेलेले दिवस
Saturday, October 17, 2009
केलेल्या चुका आता दुरुस्त होणार नाही
तुझ्या वाचून माझे मन रमनार नाही
मला विसरने ही तुला जमणार नाही
गेले क्षण सोनेरी कसे कळणार नाही
प्रेमाची सांज पुन्हा तशी ढळनार नाही
आता मी तुझ्याविना कधी जगणार नाही
तू माझी हो याविना काही मागणार नाही
माझ्या विरही माझी साथ मिळणार नाही
प्रेमात माझ्या वेडी रात्र छळनार नाही
- काव्य सागर
क्षण एक ही कुणाची...
Sunday, September 13, 2009
आयुष्याच्या या वाटेवर मला थांबणे पसंत नाही
धावत्या काट्यावरी मी क्षणा क्षणाची माळ गुंफली
तोल सावरता पायात सर्कशीतली तार गुंतली
कालची पर्वा न मजला गेल्या क्षणाची खंत नाही
पुण्याचा हिशोब कोठला येते जगण्याची घरघर
पापाने भरल्या घड्यात ओंजळभर दुखा:ची भर
चुका घडल्या हातुनी त्या वळून पाहण्या उसंत नाही
नात्यातल्या बंधनाचा अर्थ ना मजला उमगला
हृदयातल्या स्पंदनाचा कंप न मजला बिलगला
प्रिय जणांच्या सहवासी सुख शोधण्याचा छंद नाही
-काव्य सागर
आज पुन्हा हृदयाची...
डोळ्यांच्या किरणांनी मनात डोकावून गेली
स्वप्न परी मनीची का अवनीत उतरावी
वेड्या मनास वाटे मनमोहिनी असावी
आली समोर अवचित हा भास मिटवून गेली
पायी न पैंजण जरी पावली झणकार होती
लाजर्या नजरेत ही निरालीच धार होती
वार्यापरि ती अलगद मज गूज सांगून गेली
माझ्या मनी प्रियेच्या ओठीचे गीत होते
ओठी तिच्या फुलासम गुलाबी मधुर स्मित होते
न बोलता काही ती नजरेस बोलून गेली
काही न कळे मजला कसलीशी जादू झाली
मागे वळून पाहता ती लाजून चूर झाली
धुंद न ज्याची सारे ऐसे वेड लावून गेली
-काव्य सागर
