Showing posts with label माझ्या कविता. Show all posts
Showing posts with label माझ्या कविता. Show all posts

प्रवासी

Tuesday, September 11, 2018

उरी घाव सोशीत जाईन मीही
नव्याने पुन्हा गीत गाईन मीही

जरी अंधकारात रात्रंदिनी मी
उद्याचा उष:काल पाहीन मीही

निघालो असा दूरच्या मी प्रवासा
नवे गाव शोधीत राहीन मीही

विषाचे घडे पेरलेले नशीबी
सडे अमृताचेच वाहीन मीही

जरी खोल आहे जुने दु:ख माझे
सुखाच्या सरी आज नाहीन मीही

-काव्य सागर

वरदान

Sunday, March 4, 2018

शब्दांस माझिया या ताल लाभू दे
गाण्यास सूर त्याला चिरकाल लाभू दे

मी पेरलेत थोडे शब्द कालच्या भुईत
त्या स्पर्श जीवनाचा आज लाभू दे

बंदिस्त काल होते झाले ते मोकळाले
घेण्यास त्या भरारी अवकाश लाभू दे

भिडतील काळजाला विसरोनी वर्णभेद
मिरवावयास ऐसी जात लाभू दे

माझे मी काय गातो, देणे गुणिजनांचे
शब्दांस अमृताचे वरदान लाभू दे

-काव्य सागर

शब्दकळा

Sunday, September 17, 2017

लिहीन म्हणता लिहून जातो कविता एखादी
शब्द देखणे वेचून घ्यावे म्हणतो त्या आधी

शब्दांचे या सडे पसरता अंगणी मनाच्या
बहरून येई प्रतिभा रंगे संग जीवनाच्या

जरा कुठे बेसावध होता मी एखादी वेळ
शब्दांनी या डाव साधला नवा मांडला खेळ

पुन्हा लिहाया जरी बैसलो मांडुनिया मी ठाण
कसे नव्याने लाभायाचे शब्दांचे वरदान

आताशा मज रमणे नाही काव्याच्या सागरी
शब्दांविन ती कविता माझी अधुरी राहो जरी

-काव्य सागर

कविता अशीच असते

Monday, December 3, 2012

मी एक कविता लिहिली
आणि फेकून दिली रस्त्यावर...
आता तिचे भवितव्य तीच जाणे !

ती वाऱ्याशी गुजगोष्टी करेल
त्यावर स्वार होऊन तरंगत राहील
तेव्हा कुणीतरी सहज खिडकीपाशी गुणगुणताना
सापडेल त्याला अलगदपणे...

कदाचित मातीत मिसळूनही जाईल
आणि उगवेल एखाद्या रातराणीच्या रूपात
मग कुणीतरी हिची तुलना तिच्याशी करेल
तेव्हा मोहरून जाईल ती...

अगदीच नाही तर मग
पावसात चिंब चिंब होऊन
जलसरींच्या नादाशी एकरूप होईल
बेमालूमपणे एखादे गीत होऊन...

अन हेही जमले नाही तर
ज्या ठिकाणी शेवटचा श्वास घेतला
तेथून जाणाऱ्या एखाद्या कवीला झपाटून टाकेल
पण आपले ध्येय साध्य केल्याशिवाय तिला शांती लाभणार नाही...

कविता अशीच असते...कविता अशीच गवसते.

-काव्य सागर

ओळख

Monday, May 21, 2012


ते म्हणतात की ओळखतात मला...

ते मला पाहतात, बोलतात माझ्याशी
आणि आपापल्यापरीने मला ओळखून असतात...

जन्मल्या क्षणापासून जे गणित
अधिकाधिक क्लिष्ट होत चालले आहे
ते पूर्ण जाणून घेतल्याविनाच सोडवू पाहतात त्याला...

उद्या मी गेल्यावर म्हणतील
ओळखायचो मी त्याला,
माझ्याबद्दल काही मते मांडून
कमी जास्त अश्रूदेखील ढाळतील...

ते खोटे नसतील म्हणा !
पण प्रत्येकाला उमगलेला मी
माझ्या एकूण अस्तित्वाचा
कितवा अंश असेल हे कुणाला ठावूक ?

ते ठावूक होण्याआधीच
मी मागे ठेवून गेलो असेन
माझी अस्पष्टशी ओळख

खरी ओळख मात्र रहस्याप्रमाणे
कायमची गाडली जाईल...

ती फक्त 'त्याला' आणि मलाच ठावूक !

-काव्य सागर

सखे कशाला

Sunday, February 26, 2012

सखे कशाला फिरायचे चांदण्यात जग थांबले असावे
तुला पाहण्या अधीरला चंद्रमा ग्रहण लांबले असावे

नभात ज्या तारका पहुडती जळून गेल्या तुझ्या रुपावर
उगा न उल्का अशा विखुरती कुणी नभी भांडले असावे

कशा कुणा ना कधी गवसल्या तुझ्या पदांकीत पायवाटा
नभांगणातून नक्षत्रांचे सडे धरी सांडले असावे

असे नको भासवू प्रिये की तुला तुझी आयुधे न ठावुक
मला न शंका तुला बघोनी कुणी सुखे नांदले असावे

तसे तुझ्या कौतुका लिहाव्या कितीक गझला, कथा किती गे
उधार घेऊन शब्द कविने मनातले मांडले असावे

-काव्य सागर

ओंजळ

Wednesday, December 14, 2011

त्या ओंजळ भर पाण्याने
अर्घ्य वाहिले असेल पहाटे पहाटे

त्या ओंजळ भर पाण्यातूनच
उगम झाला असेल एखाद्या गंगेचा

त्या ओंजळ भर पाण्यात
भर पडली असेल कुणाच्या आसवांची

त्या ओंजळ भर पाण्यात
आपला चेहरा पाहून लाजलेही असेल कोणी

त्या ओंजळ भर पाण्याने
शमली असेल तहान थकल्या-भागल्याची

त्या ओंजळ भर पाण्याने
झोप उडाली असेल कित्येक वर्षे झोपलेल्यांची

ओंजळ भर का असेना...
पण त्या पाण्याला जीवन ऐसे नाव आहे...
-काव्य सागर

काळा चष्मा

Sunday, September 18, 2011


या काळ्या चष्म्यामागून
पाहत जाईन तुला...

तुझ्या नजरेस नजर मिळवणे अवघड वाटले
तरी चोरून चोरून पाहीन तुला...

या काळ्या चष्म्याआड दडलेत डोळे
तुझा आदर करणारे...तुझ्यावर प्रेम करणारे...

कधीतरी तुझ्यासारखे बनण्याचे स्वप्न पाहणारे वेडे डोळे...
आणि म्हणूनच उघड्या डोळ्यांनी
तुझ्याकडे पाहण्याची हिम्मतच होत नाही...

तू ओळखशील माझ्या डोळ्यांतील अपराधी भाव...
तुला दिलेल्या वचनांची पूर्तता न केल्याने आलेला अपराधीपणा

एव्हाना पर्यंत तू तो ओळखला असशीलच...
पण तरीही तो लपवण्याचा प्रयत्न आहेच...
स्वत:ला फसवत जगण्याचा प्रयत्न आहेच...
मिटल्या डोळ्यांनी हसण्याचा प्रयत्न आहेच...

 -काव्य सागर

कवितेपायी

Friday, July 22, 2011

कुठल्याश्या कवितेपायी 
मी विसरून गेलो तुजला 
हे भास असे प्रतिदिवशी
होतात सखे ग मजला

मी विसरून गेलो आहे
तुजवर रचल्या कविता
पण शब्द शब्द कवितेचे 
मी लिहिले तुझ्याचकरिता

तू सोडून मज जाताना
जी लकेर गाऊन गेली
त्या नाजूक वेलीवरती 
कवितेची फुले उमलली 

हे काय मला मग झाले 
कवितेचे वेडच जडले 
अन शब्द ओंजळीत घेता 
प्रतिबिंब तुझेच पडले 
 
पण कवितेचे दुर्भाग्य
ती सवत तुझी बघ झाली
अन याद तुझी जपताना 
माझ्यातच विलीन झाली 

-काव्य सागर

अश्वमेध यज्ञाचा घोडा

Saturday, May 14, 2011

अश्वमेध यज्ञाचा घोडा
धावतो आहे...
गेली कित्येक वर्षे
वेड्यासारखा धावतोच आहे...
आणि आता वेगही वाढलाय त्याचा...
वाऱ्याशी स्पर्धा करत
सुसाट सुटलाय तो...
आता त्याला कसलीच पर्वा नाहीये...
वेग...वेग हवाय फक्त त्याला...
त्याला सोडणारा मात्र
कधीच काळाच्या पडद्याआड गेला...
पण या घोड्याला
त्याचा थांगपत्ताच नाही...
आणि त्याला हवे असलेले गाव
तर कित्येक कोस दूर राहिले आहे...
तो तरीही धावतोच आहे...
आता मागे वळून पहिले
तरी पाय मात्र मागे वळत नाहीत...
त्यांना सवय लागलीय
पुढेच जाण्याची...
वेळीच थांबले असते तर बरे झाले असते...

-काव्य सागर

प्रतिभा

Wednesday, April 20, 2011

अंतरंगात खोलवर कुठेतरी दडलेली
आणि वेळोवेळी मला छळणारी...ती प्रतिभा कुठे गेली ?

अंधारात चाचपडताना आशेचा किरण बनून
माझ्या रोमरोमी जळणारी...ती प्रतिभा कुठे गेली ?

कधी वसंत कधी शिशिर बनणारी
कधी आपुलेच रंग उधळणारी

आपल्याच धुंदीत जगणारी
सावलीहून अधिक साथ देणारी

कधी जगण्याचे साधन होणारी
कधी श्वासांची जागा घेणारी

दु:खात अधिकच उफाळून येणारी
आणि सुखात भरभरून देणारी

...एका अपघाताने का प्रतिभा नाहीशी होते ?
मी जिवंत आहे म्हणजे ती ही आहेच...!
प्रतिभा अशी मरणार थोडीच...
कदाचित मी गेल्यावरही असेल ती इथेच
माझ्या आठवणींची शिदोरी बनून...

-काव्य सागर

ती...

Thursday, March 3, 2011

अजून ही मला खरं वाटत नाही
ती नाहीये हे मनास पटत नाही

आता काल-परवा पर्यंत ती होती
माझ्या अवती-भवती दरवळत
एखाद्या उमळत्या कळीप्रमाणे
मनात भिनलेली कळत-नकळत

ती होतीच तितकी सुंदर
कानात अजूनही आहेत तिचे बोल
तिची साथ म्हणजे जणू इंद्रधनू
प्रत्येक रंग त्याचा होता अनमोल

तिच हसणं तिच असणं
हे किती सुखद असायचं
गोजिर्‍या गाली तिच्या
फूलपाखरू हसायचं

तिचे श्वास हेच माझे आयुष्य
तिच्याविना मी कुठे जगत होतो
सुखाच्या सागरी निजावं तिने
हेच देवाकडे मागणं मागत होतो

पण ती खरंच एक कळी होती
कळीच आयुष्य ते केवढं
मूठभर पाणी हाती घेऊन
ती उघडल्यावर राहील तेवढं

चिमुकल्या हातांनी जन्मभराच्या
आठवणी देऊन गेली आहे
प्राण माझे ही घेऊन गेली
शरीर फक्त ठेऊन गेली आहे

- काव्य सागर

माणसे...

Monday, November 1, 2010

माणूस म्हणून जन्माला आलो तेव्हापासून...
पाहतो आहे सारी माणसे
माणसे, त्यांचे रंगीबेरंगी चेहरे, त्यांचे स्वभाव

तेव्हा कळली फक्त त्यांची नावे...
आता कुठे माणूस म्हणून कळू लागली आहेत...
आता कुठे काही मुखवटे गळून पडले आहेत...

ते गळण्यापूर्वी दिसत होते ते किती सुंदर हसरे चेहरे...
ते कळण्यापूर्वी भेटत होती न कळलेली काही माणसे...

ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती असलेला तो प्राणी
अधूनमधून भेटतोही..पण फार दुर्मिळ...

आणि तेव्हापासून येता-जाता आरशासमोर आलो की...
माझा चेहर्‍यावर ही कुठले मुखवटे चढले नाहीत ना
याची खात्री करून घेतो...मगच माणूस म्हणून मिरवतो...!

-काव्य सागर

वादळानंतर...

Thursday, August 26, 2010

साजिर्‍याशा एका संध्याकाळी
कोठून जाणे कसे वादळी वारे आले
अन् बघता बघता सारे उद्ध्वस्त झाले
माझी स्वप्ने, माझ्या महत्वाकांक्षा
सारे सारे वाहून गेले

मी शोधू पाहतोय माझी
कवितांची वही,
माझ्या गाण्यांचे रेकॉर्ड्स
पण स्मृतिभ्रंश झाल्याप्रमाणे
काहीच आठवत नाही...

आणि त्यानंतर सुन्न मनाने
डोळे मिटून घेतो
तेव्हा घुमत राहतात
त्याच वादळी वार्‍याचे आवाज
कानामध्ये, मनामध्ये...
- काव्य सागर

कारणे घ्या..

Tuesday, June 22, 2010

मी कविता करतो कारण...
तेच मला जमते
आणि त्याहून इतर काही जमत नाही
जमत असले तरी रुचत नाही
म्हणून जे काही सुचते ते लिहित जातो

मी कविता करतो कारण...
इतर कशाहीपेक्षा
त्यातच मन रमते
कविता केल्यावर होणारा आनंद
शब्दात मांडता येत नाही
(सगळ्याच गोष्टी कवितेतून व्यक्त करता येत नाहीत)

मी कविता करतो कारण...
जेव्हा जेव्हा लिहायला घेतो
तेव्हा मीच मला गवसत जातो
प्रत्येक कविता नवी उमेद,
नवा जन्म देऊन जाते

मी कविता करतो कारण...
फारसा वेळ लागत नाही
अस्वस्थ मनाला कागदावर उतरवले की झाले
खासा वेळ काढून
लिहिण्याचा कार्यक्रम आखता येत नाही

मी कविता करतो कारण...
फार खर्चही होत नाही
कोरा कागद आणि पेन एवढ्या
फुटकळ साहित्यावर अनेक
कविता रंगवता येतात

मी कविता करतो कारण...
कविता करायला आवडतात
हव्या तशाच कविता लिहिता येतात
सूर लागला नाही अशी
कारणे द्यावी लागत नाहीत

मी कविता करतो कारण...
शब्दच येतात बहरुन
मी फक्त लिहिण्याचे कष्ट घेतो
अन् कित्येकदा तेही घेत नाही!

मी कविता करतो कारण...
गाणे जरी जमत नसले
तरी शब्द तालावर घोंगावत राहतात
अन् अंतरंगीचा सूर लाभला
तरी कवितेचे गाणे होतेच

मी कविता करतो कारण...
एकटेपणाला याहून चांगली
सोबत नाही
अन् कवितेशिवाय एकाकी जीवन
शोभत नाही

मी कविता करतो कारण...
...कारण हा माझा प्रांत आहे
कविता करायला हजार कारणे सापडतील
पण कविता न करण्याची कारणे
कुणाला द्यावी लागत नाही
-काव्य सागर

दु:ख नव्हतेच इतके

Friday, April 30, 2010

दु:ख नव्हतेच कधी इतके
जितके मला वाटले होते
प्रश्न ही नव्हते इतके अवघड
जे मनी दाटले होते

मी उगाचच समस्यांना
भाव देत होतो
स्वत:हून मनास माझ्या
घाव देत होतो
जे कोडे सुटणार होते सहजतेने
त्यात उगाच जीवास गुंतत होतो

अडथळे यायचेच असतात
यशाच्या मार्गात
वाट शोधताना चालायचे
आहेच काट्यांत
मी दुखर्‍या जखमेस जपताना
व्यर्थ अश्रू ढाळीत होतो

अजुन कित्येक दु:खे बाकी
आहेत जगात
मदतीस सरसावताहेत अजुनी
असहाय्य हात
माझे दु:ख होते खरे राईएवढे
ज्यास मी पर्वतासम मानत होतो

-काव्य सागर

आसक्ती

Thursday, April 29, 2010

मला काय हवे आहे?
माहीत नाही...खरंच माहीत नाही...
मला कसलीच आसक्ती नाही
मी कशाला जगत आहे ? कोणासाठी जगत आहे?
आपल्या लोकांसाठी? छे!
प्रेम, आपुलकी, माया कसलीच बंधने मला बांधत नाहीत
मग काय हवे आहे मला?

पैसा, नाव, प्रसिद्धी की अजून काही?
पण मला कशाचाच लोभ, हव्यास नाही
मला फक्त जगायचंय!
जगण्याच्या उमेदीपुढे सारे थिटे
आणि तितकेच फसवे आणि खोटे !

मला कसलीच गरज भासत नाही
भौतिक गरजा आहेत पण त्या
फक्त शरीर जगवण्यासाठी
मनाचे काय?
ते कुठेच थांबत नाही
कुठेच रमत नाही

कविता करतो मी
पण फक्त सुचतात म्हणून
त्यांचे व्यसन नाही जडले अजून
इतर ही अनेक छंद आहेत
पण छंदांचा कंटाळा आला तर काय करावे?

काय केले म्हणजे जीवास शांतता लाभेल
नामस्मरण करावे तर देवावर श्रद्धा नाही
काम करावे तर उगाच जीवास त्रास का?

हे असे रोजचेच झाले आहे
आला दिवस ढकलण्याचे
उद्योग तेवढे सुरू आहेत
आणि हे असेच चालू राहणार
शेवटचा श्वास असेपर्यंत
बहुतेक त्यांची तरी साथ लाभेल...!

-काव्य सागर

अस्वस्थाचे जीणे

Tuesday, April 6, 2010

विचारांची वर्दळ अन् मनाची मरगळ
यातून जन्मा आले माझे अस्वस्थाचे जीणे
कामांची धावपळ अन् जीवाची होरपळ
यातून नशिबी आले माझे अस्वस्थाचे जीणे

रोज नवा प्रश्न त्याचे रोज नवे उत्तर
भिंती झाल्या पोलादी पण गळके माझे छप्पर
आमच्या माती सदैव घामाच्या धारांनी न्हाने
म्हणून आमच्या नशिबी आले अस्वस्थाने जीणे

दुरावाल्या देशाची भेट काही होत नाही
चक्रावल्या वाटाही थेट घरी येत नाही
आम्ही आमच्या घरी पोचण्या पत्ता शोधत जाणे
म्हणून आमच्या नशिबी आले अस्वस्थाने जीणे

वसंत नशिबी आला न अन् शिशीर आला कधीही
चांदणे लाभले ग्रीष्माचे पण ते ही न टिकले क्षण ही
फूल न आले दारी माझे आली केवळ पाने
म्हणून आमच्या नशिबी आले अस्वस्थाने जीणे

डोळ्यात माझिया एक घेऊन निघालो स्वप्न
पण अडवत होते मजला वाटेत अनामिक प्रश्न
या प्रश्नातुनही मजला न सुचले कधीही गाणे
म्हणून आमच्या नशिबी आले अस्वस्थाने जीणे
-काव्य सागर

जरा जगून बघू...

Friday, January 22, 2010

रोज रोज पुन्हा पुन्हा
तेच रडगाणे
ओठांवरी हसू तरी
किती रे बहाने
पुर्‍या झाल्या पळवाटा
थोडे थांबून बघू
जरा जगून बघू...

कोण तुझे कोण माझे
शोधायला वेळ नाही
धावत्या पायाचा माझ्या
घड्याळाशी मेळ नाही
वेळ-काळ विसरून पुन्हा एकवार
कधीतरी पायवाट चुकुन बघू
जरा जगून बघू...

दु:ख माझ्या उरातले
रोज रोज सलते हे
सुख जरी नाममात्र
तरी कुठे मिळते हे
सोड सार्‍या दु:खचिंता मनाच्या तळ्यात
घेउनिया झेप जरा उडून बघू
जरा जगून बघू...

प्रेम माझे सांगण्यास
माझ्यापाशी बोल नाही
तरी मुकेपणाचेच
क्षण अनमोल काही
हात हाती घेउनिया सांज ढळताना
आभाळीचा चंद्र तिच्या डोळ्यात बघू
जरा जगून बघू...

मन दु:खाच्या भरात
जरी होई दीनवाणे
मुखवट्यांच्या जगात
ओठी सुखाचे तराणे
शहाण्याचे सोन्ग पुरे, मनातून खरे
वेड्यापरि थोडे आता वागून बघू
जरा जगून बघू...
-काव्य सागर

''कविता कशा सुचतात रे ?''

Wednesday, December 16, 2009

''कविता कशा सुचतात रे ?''
माझ्या मित्राचा नेहमीचा प्रश्न
मी त्याकडे पाहतो आणि फक्त हसतो

'' अरे फार काही अवघड नाही रे
एक कोरा कागद, एक पेन आणि अस्वस्थ मन
एका जागी जमले, सूर जुळले की
मग होऊन जाते कविता
वार्‍यावर उडणार्‍या पिसाप्रमाणे मन भरकटू लागते
अन् भरकटल्यासारख्या कविता करू लागते
आता हल्ली कविता भरकटत चालल्या आहेत खर्‍या
पण जिथे माणूसच भरकटत आहे तिथे कवितांच काय ?

कविता म्हणजे स्वातंत्र्य, कविता म्हणजे मोकळा श्वास
कुणी शिकवून येत नाहीत रे कविता
इथे शब्दांची जुळवाजुळव नको अन् भावनांचा आविष्कार ही नको
केवळ जे सुचेल ते लिहावे, मनास रुचेल ते लिहावे
कुणाच्या तरी प्रेमात ही पडावे
एकदा तिच्या प्रेमात पडलो की कवितांची वेल अशी बहरते म्हणून सांगू...
मग ध्यानी मनी केवळ प्रेमाच्याच कविता...
प्रेम असेपर्यंत सगळे ठीक असते
पण विरहात मात्र शब्दच अधिक साथ देतात
मग शब्दांच्या प्रेमापुढे ते प्रेम फिके वाटू लागते
बघता बघता आपण कवितेच्याच प्रेमात पडू लागतो

पहिल्यांदा जो फक्त छंद असतो
त्याची नंतर सवयच लागते
वेड्यासारख्या कविताच करायला लागतो
दिवसभर जिथे तिथे कविताच
रात्र-रात्र जागून काढली आहे रे
आणि अंधारात चाचपडत एका कोर्‍या कागदावर
दिसत नसतानाही कविता लिहिली आहे
काय सांगू तुला ?

हे वेडेपण अंगात भिनत जाते
आणि वेडेपणाने जगण्यात खरा शहानपणा आहे हेही कळत जाते
मग शहाण्यासारखे जगण्याचा वेडेपणा कोण करणार ?
हळूहळू व्यसनच लागते कवितांचे
मग आपल्या नेहमीच्या बोलण्यालाही लोक कविताच समजू लागतात
अर्थात आपल्याला काही फरक पडत नाही
आपण स्वछन्दपणे या आभाळात विहरतो
सुख-दु:खाच्या या फसव्या जगापासून
आपण केव्हाच मुक्त होऊन जातो
आता फक्त मी आणि माझी कविता
मी तिच्यात भिनत जातो आणि ती माझ्यात... ''

एवढे सांगून ही हे शहाणे लोक काही समजत नाही
आणि शेवटी वेड्यासारखा प्रश्न विचारून मोकळे होतात

'' मला शिकवशील का रे कविता ?''
मी त्याकडे पाहतो आणि फक्त हसतो....

-काव्य सागर