दाद

Sunday, April 15, 2018

बोलणारे बोलताती आपुल्याला काय त्याचे?
मी जगावे की मरावे या जगाला काय त्याचे?

पूर्वजांच्या दौलतीचे सोहळे मी रोज केले
आज वैभव भोगतो मी पण उद्याला काय त्याचे?

गाळती ते घाम सारे पिकविण्या मातीत मोती
पण अवेळी कोसळे त्या पावसाला काय त्याचे?

रोज अत्याचार होतो मंदिराच्या पायथ्याशी
सोंग घेऊ झोपलेल्या माणसाला काय त्याचे?

वाह! कोणी दाद देती, मर्म ही कळल्याविना ते
वाचका तू कमनशीबी सागराला काय त्याचे?

-काव्य सागर