Showing posts with label विनोदी कविता. Show all posts
Showing posts with label विनोदी कविता. Show all posts

नोटबंदी

Thursday, November 15, 2018

नोट मोजुनी अति मी दमले
थकले रे मोदी बाळा !

निलाजरेपण मतीस ग्रासले, स्वार्थीपणाचा शेला
सोनियाचे मज कुंडल कानी आणि घडविल्या माळा
करगंगेच्या काठावरती जमला पैसा काळा!

विषयवासना लागे जीवा, वय अपुले सरताना
कुठली नीती देशा पायी, कुसंगती करताना
नोट गुलाबी परि जमविण्या करी मी आणखी चाळा!

-काव्य सागर

अणुबॉम्ब

Sunday, May 15, 2011

बघेन बघेन आणि
एक अणुबॉम्ब टाकीन म्हणतो...

म्हणजे कसं एका झटक्यात
सारे रान मोकळे
म्हणजे एकदाच या जाचातून
साऱ्यांची सुटका होईल...

हा...तसं त्या असंख्य जीवांच्या
हत्येचे पाप लागेल मला...
पण चालायचेच !...
.
.
.
...घर स्वच्छ ठेवायचे
तर हे व्हायलाच हवे...
जाम उच्छाद मांडलाय
मुंग्यांनी घरात !
काहीतरी करायलाच हवे ना...!

-काव्य सागर

आळसे कार्यभाग नासतो ?

Monday, October 19, 2009

कोण तो शहाणा म्हणतो की
आळसे कार्यभाग नासतो
रम्य मधुर आलस्यमय
सुख वदनी काळे फासतो

आळसाचरणी मी विलीन
राहता सदैव कर्महीन
जीवन हे माझे कष्टावीन
सुखमय राहीन सर्वदा

आळसात आहे सर्व सुख
प्रसन्नपणात कष्ट खूप
गाळुणी घाम साहुनी दु:ख
का करिशी तू रूप बावळे

आळशी जरीही आम्ही असू
चेहर्‍यावरी आमुच्या हसू
मजेत लोळत घरी बसू
रात्रंदिन आम्हा आळसाचा
-काव्य सागर