माणसे...

Monday, November 1, 2010

माणूस म्हणून जन्माला आलो तेव्हापासून...
पाहतो आहे सारी माणसे
माणसे, त्यांचे रंगीबेरंगी चेहरे, त्यांचे स्वभाव

तेव्हा कळली फक्त त्यांची नावे...
आता कुठे माणूस म्हणून कळू लागली आहेत...
आता कुठे काही मुखवटे गळून पडले आहेत...

ते गळण्यापूर्वी दिसत होते ते किती सुंदर हसरे चेहरे...
ते कळण्यापूर्वी भेटत होती न कळलेली काही माणसे...

ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती असलेला तो प्राणी
अधूनमधून भेटतोही..पण फार दुर्मिळ...

आणि तेव्हापासून येता-जाता आरशासमोर आलो की...
माझा चेहर्‍यावर ही कुठले मुखवटे चढले नाहीत ना
याची खात्री करून घेतो...मगच माणूस म्हणून मिरवतो...!

-काव्य सागर

निर्विकार

Wednesday, September 22, 2010

हल्ली कसलाच परिणाम
होत नाही माझ्यावर
सर्व त्रास, सर्व दु:खे
निमूटपणे सहन करत राहतो मी
सर्व वेदना शांतपणे भोगत राहतो मी
शेवटी मग वेदनाच कंटाळून निघून जातात
आणि चेहर्‍यावर उरतात फक्त काही निर्विकार भाव
काहीतरी जिंकल्याचे...
बरेच काही हरल्यानंतर...

-काव्य सागर

वादळानंतर...

Thursday, August 26, 2010

साजिर्‍याशा एका संध्याकाळी
कोठून जाणे कसे वादळी वारे आले
अन् बघता बघता सारे उद्ध्वस्त झाले
माझी स्वप्ने, माझ्या महत्वाकांक्षा
सारे सारे वाहून गेले

मी शोधू पाहतोय माझी
कवितांची वही,
माझ्या गाण्यांचे रेकॉर्ड्स
पण स्मृतिभ्रंश झाल्याप्रमाणे
काहीच आठवत नाही...

आणि त्यानंतर सुन्न मनाने
डोळे मिटून घेतो
तेव्हा घुमत राहतात
त्याच वादळी वार्‍याचे आवाज
कानामध्ये, मनामध्ये...
- काव्य सागर

विश्वास

Friday, August 13, 2010

माझा विश्वास नाही!
कशावरही; कुणावरही
विश्वास बाळगावा तरी का?

या मार्गाच्या कुठल्याश्या
वळणावर 'घात' होऊन
विश्वासघात होण्याची 'शक्यता' ( विश्वास नव्हे!)
जिथे आहे तिथे-
विश्वास कुणावर ठेवावा?

म्हणूनच मी विश्वास ठेवत नाही...
असलाच तर आत्मविश्वास आहे
स्वत:वर, स्वत:च्या विचारांवर,
कर्तृत्वावर वगैरे वगैरे...

कारण इथे घात होणार नाही
असा माझा 'विश्वास' आहे

मी माझा विश्वासघात करणे
शक्य नाही....
( आणि केलाच तरी तो
कळणार कुणाला ?)

-काव्य सागर

आता सारे शांत शांत

Tuesday, June 29, 2010

आता कसे सारे शांत शांत होईल

मेघ दाटून येतील, पाऊस ही बरसेल
मग सारी सृष्टी निवांत होईल

जलधारांनी या धरणीची आग शमेल
मग उन्हाळी ऋतूचा सुखांत होईल

दु:खाचे मळभ जाईल, नभ सावळे होईल
मग ही धरणी सुखाचा प्रांत होईल

उन्हे कोवळी पसरतील, इंद्रधनू उतरेल
या धरेवरी मग स्वर्गाचा भ्रांत होईल

-काव्य सागर

कारणे घ्या..

Tuesday, June 22, 2010

मी कविता करतो कारण...
तेच मला जमते
आणि त्याहून इतर काही जमत नाही
जमत असले तरी रुचत नाही
म्हणून जे काही सुचते ते लिहित जातो

मी कविता करतो कारण...
इतर कशाहीपेक्षा
त्यातच मन रमते
कविता केल्यावर होणारा आनंद
शब्दात मांडता येत नाही
(सगळ्याच गोष्टी कवितेतून व्यक्त करता येत नाहीत)

मी कविता करतो कारण...
जेव्हा जेव्हा लिहायला घेतो
तेव्हा मीच मला गवसत जातो
प्रत्येक कविता नवी उमेद,
नवा जन्म देऊन जाते

मी कविता करतो कारण...
फारसा वेळ लागत नाही
अस्वस्थ मनाला कागदावर उतरवले की झाले
खासा वेळ काढून
लिहिण्याचा कार्यक्रम आखता येत नाही

मी कविता करतो कारण...
फार खर्चही होत नाही
कोरा कागद आणि पेन एवढ्या
फुटकळ साहित्यावर अनेक
कविता रंगवता येतात

मी कविता करतो कारण...
कविता करायला आवडतात
हव्या तशाच कविता लिहिता येतात
सूर लागला नाही अशी
कारणे द्यावी लागत नाहीत

मी कविता करतो कारण...
शब्दच येतात बहरुन
मी फक्त लिहिण्याचे कष्ट घेतो
अन् कित्येकदा तेही घेत नाही!

मी कविता करतो कारण...
गाणे जरी जमत नसले
तरी शब्द तालावर घोंगावत राहतात
अन् अंतरंगीचा सूर लाभला
तरी कवितेचे गाणे होतेच

मी कविता करतो कारण...
एकटेपणाला याहून चांगली
सोबत नाही
अन् कवितेशिवाय एकाकी जीवन
शोभत नाही

मी कविता करतो कारण...
...कारण हा माझा प्रांत आहे
कविता करायला हजार कारणे सापडतील
पण कविता न करण्याची कारणे
कुणाला द्यावी लागत नाही
-काव्य सागर

लाचारी

Monday, June 21, 2010

आजपर्यंत कायम ताठ मानेने जगत आलो
कधीच हार मानली नाही
कधीच लाचारी पत्करली नाही
कधीच परिस्थितीपुढे हात टेकले नाही...

...पण हल्ली कविता करायला लागल्यापासून
खाली मानेने निमूटपणे लिहित चाललो आहे
-काव्य सागर