कवितांचा पसारा

Wednesday, May 12, 2010

कविता सूचायला लागल्या
की एक सोडून भाराभर सुचू लागतात
आणि बहुतेकदा एका कवितेचा
दुसर्‍या कवितेशी कुठेही संबंध नसतो

एक ओळ गाठीशी धरून
कविता लिहायला घ्यावी
तर त्याच धाटणीच्या
अनेक ओळी रांगेत उभ्या असतात

त्यातील प्रत्येक ओळ आपआपले
रंग दाखवू लागते
मग कधी उदास...
तर कधी आशावादी
कधी वृत्तबंध...
तर कधी मुक्तछंदी

बर्‍याच ओळींच्या गोळाबेरजेतून
अनेक कवितांचा पसारा मांडतो
त्यात कित्येक कविता
एकमेकांत गुंतून पडलेल्या...

मग त्यांना शहाण्या मुलासारखे
हाताला धरून वेगवेगळ्या कवितेत मांडावे लागते
तेव्हा कुठे कविता कळू लागते
तुम्हालाही अन् मलाही...!

-काव्य सागर

कोर्स

Tuesday, May 11, 2010

तशा डिग्र्या बर्‍याच
मिळवल्या आतापर्यंत !
ग्रॅज्युएशन झाले, पोस्ट ग्रॅज्युएशन झाले
सी.ए. ही झाले !
आता पुढे काय?

एखादा कवितांचा कोर्स
करीन म्हणतो...
म्हणजे तशा फुटकळ
कविता करतोच मी

पण डिग्रीशिवाय
वॅल्यू कुठे ?
म्हणूनच सध्या
'कवी' ही डिग्री मिळवण्याच्या
फंदात पडत आहे

तुम्हाला काही माहीत
असल्यास प्लीज कळवा हं !

-काव्य सागर

सुतक

Monday, May 10, 2010

माझ्या गावी दु:खाचा पूर आला
सोबतीला आसवांचा पाऊस झाला
म्हणून मी सुतक पाळले...

जोपर्यंत सारे पूर्ववत होत नाही
...तोपर्यंत
जोपर्यंत जखम भरून येत नाही
...तोपर्यंत

कदाचित काही काळानंतर
सारे पूर्ववत होईल ही
जखमा भरून येतील ही
मग पुन्हा सुखाचे दिवस येतील
अन् सुतक संपेल ही

पण...
अशी अनेक गावे असतील
जिथे कायमचाच दुष्काळ असेल
जिथे दिवस उजाडत नसेल
जिथे शेतात फक्त काटेच उगवत असतील
जिथे सुखाचे वारे वाहत नसतील

त्यांनी का आयुष्यभर
सुतकच पाळावे ?

-काव्य सागर

प्रवाह

Friday, May 7, 2010

रात्री झोपण्यापूर्वी मी मोबाईलवर गाणी ऐकत असताना
कुठून तरी ती चिमुरडी आली आणि
सर्र्कन माझ्या नकळत तिने हेडफोनची वायर खेचली
आणि एकदम...हॉस्पिटलमध्ये
शरीरात रक्त भरून घेणार्‍या पेशंटला जाग यावी
तसा मी भानावर आलो !
पाहतो तर मोबाईल मधून संगीतरूपी रक्त वाहते आहे !
मी पटकन खंडित झालेला प्रवाह जोडला
आणि पुन्हा पूर्वीसारखे संगीत वाहू लागले

तरी बरे मी झोपलो नव्हतो
नाहीतर किती रक्त वाया गेले असते
कुणास ठाऊक ?

-काव्य सागर

दु:ख नव्हतेच इतके

Friday, April 30, 2010

दु:ख नव्हतेच कधी इतके
जितके मला वाटले होते
प्रश्न ही नव्हते इतके अवघड
जे मनी दाटले होते

मी उगाचच समस्यांना
भाव देत होतो
स्वत:हून मनास माझ्या
घाव देत होतो
जे कोडे सुटणार होते सहजतेने
त्यात उगाच जीवास गुंतत होतो

अडथळे यायचेच असतात
यशाच्या मार्गात
वाट शोधताना चालायचे
आहेच काट्यांत
मी दुखर्‍या जखमेस जपताना
व्यर्थ अश्रू ढाळीत होतो

अजुन कित्येक दु:खे बाकी
आहेत जगात
मदतीस सरसावताहेत अजुनी
असहाय्य हात
माझे दु:ख होते खरे राईएवढे
ज्यास मी पर्वतासम मानत होतो

-काव्य सागर

आसक्ती

Thursday, April 29, 2010

मला काय हवे आहे?
माहीत नाही...खरंच माहीत नाही...
मला कसलीच आसक्ती नाही
मी कशाला जगत आहे ? कोणासाठी जगत आहे?
आपल्या लोकांसाठी? छे!
प्रेम, आपुलकी, माया कसलीच बंधने मला बांधत नाहीत
मग काय हवे आहे मला?

पैसा, नाव, प्रसिद्धी की अजून काही?
पण मला कशाचाच लोभ, हव्यास नाही
मला फक्त जगायचंय!
जगण्याच्या उमेदीपुढे सारे थिटे
आणि तितकेच फसवे आणि खोटे !

मला कसलीच गरज भासत नाही
भौतिक गरजा आहेत पण त्या
फक्त शरीर जगवण्यासाठी
मनाचे काय?
ते कुठेच थांबत नाही
कुठेच रमत नाही

कविता करतो मी
पण फक्त सुचतात म्हणून
त्यांचे व्यसन नाही जडले अजून
इतर ही अनेक छंद आहेत
पण छंदांचा कंटाळा आला तर काय करावे?

काय केले म्हणजे जीवास शांतता लाभेल
नामस्मरण करावे तर देवावर श्रद्धा नाही
काम करावे तर उगाच जीवास त्रास का?

हे असे रोजचेच झाले आहे
आला दिवस ढकलण्याचे
उद्योग तेवढे सुरू आहेत
आणि हे असेच चालू राहणार
शेवटचा श्वास असेपर्यंत
बहुतेक त्यांची तरी साथ लाभेल...!

-काव्य सागर

अस्वस्थाचे जीणे

Tuesday, April 6, 2010

विचारांची वर्दळ अन् मनाची मरगळ
यातून जन्मा आले माझे अस्वस्थाचे जीणे
कामांची धावपळ अन् जीवाची होरपळ
यातून नशिबी आले माझे अस्वस्थाचे जीणे

रोज नवा प्रश्न त्याचे रोज नवे उत्तर
भिंती झाल्या पोलादी पण गळके माझे छप्पर
आमच्या माती सदैव घामाच्या धारांनी न्हाने
म्हणून आमच्या नशिबी आले अस्वस्थाने जीणे

दुरावाल्या देशाची भेट काही होत नाही
चक्रावल्या वाटाही थेट घरी येत नाही
आम्ही आमच्या घरी पोचण्या पत्ता शोधत जाणे
म्हणून आमच्या नशिबी आले अस्वस्थाने जीणे

वसंत नशिबी आला न अन् शिशीर आला कधीही
चांदणे लाभले ग्रीष्माचे पण ते ही न टिकले क्षण ही
फूल न आले दारी माझे आली केवळ पाने
म्हणून आमच्या नशिबी आले अस्वस्थाने जीणे

डोळ्यात माझिया एक घेऊन निघालो स्वप्न
पण अडवत होते मजला वाटेत अनामिक प्रश्न
या प्रश्नातुनही मजला न सुचले कधीही गाणे
म्हणून आमच्या नशिबी आले अस्वस्थाने जीणे
-काव्य सागर