तर अजून काय हवे आहे मला ?

Sunday, September 13, 2009

मनातले सारेच बोल ओठांवर येत नाहीत
कधीकधी डोळ्यांनीच बोलावेसे वाटते
तुझ्या मनात डोकावून पाहावेसे वाटते
न बोलता ही माझ्या डोळ्यांची भाषा
तुझ्या मनास कळणार असेल
तर अजून काय हवे आहे मला ?

शब्द ही कधीकधी दगा देऊन जातात
अन् सांगायचे होते ते राहूनच जाते
आता शब्दच पानावर उतरले आहेत
न कळून ही बरेच काही
थोडे फार कळणार असेल
तर अजून काय हवे आहे मला ?

तुझ्या असण्याचे, तुझ्या हसण्याचे वेड सार्‍यांनाच आहे
तुझ्या सहवासातही उमळत्या कळ्यांचा गंध आहे
तुझ्या नसण्यात काटयाचा बोचणारा स्पर्श आहे
तू नसतानाही तुझ्या आठवनीनेच
जर मनात गंध दरवळणार असेल
तर अजून काय हवे आहे मला ?

आज आहेस माझ्या डोळ्यांसमोर
उद्या जाशील ही सोडून एकटे मला
मनातून दु:खी तू ही होशीलच ना
कुणीतरी जवळच दुरावल्याची जाणीव होऊन
तू मागे वळून पाहणार असेल
तर अजून काय हवे आहे मला ?

कधीतरी येईल तुला ही आठवण माझी
वेड्या आशावादास या हरकत काय आहे
झिजल्या जुन्या वहीची पाने चाळताना
त्यातील मी दिलेले गुलाब पाहून
माझी आठवण छलनार असेल
तर अजून काय हवे आहे मला ?

तुझ्या नसण्याचे दु:ख राहिलच नेहमी
उरातल्या या दु:खावर काही इलाज नाही
तरी हास्याचे मुखवटे असतील या चेहृयावर
माझ्या या क्षणभराच्या आनंदास पाहून
जर तुलाही दिलासा मिळणार असेल
तर अजून काय हवे आहे मला ?

असेन मी नसेन मी उद्याचे कोणास ठाऊक आहे ?
मनापासून आठवन काढ मी मनाच्या जवळच आहे
माझी पर्वा नाही ग मला जर तू दु:खात आहेस
माझ्या या क्षुल्लक सुखासोबत जर
तुझे दु:ख जळणार असेल
तर अजून काय हवे आहे मला ?

माझे सुख, माझे आयुष्य काहीच नाही ग तुझ्याविना
कित्येकदा समजावले ग मी या वेड्या मना
तू ही विचारू नकोस मागे वळून कधी
तुला काय हवे आहे ते
आता नाही पुन्हा सांगणार
तुझे सुखच तर हवे आहे मला...
तुझे सुखच तर हवे आहे मला...
-काव्य सागर

0 comments:

Post a Comment